शाळांमध्ये आनंदमय वातावरण; विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
निलेश जाधव / देवरूख:
सोमवारपासून शाळा सुरू झाल्या असून संगमेश्वर तालुक्यात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळांमध्ये ८९५ नवागतांचा ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. तालुक्याच्या विविध भागांतील शाळांमध्ये पहिल्यांदाच प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे (नवागतांचे) शिक्षक आणि ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ, गुलाबपुष्पे देऊन तसेच औक्षण करून अत्यंत आनंदात ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंद संचारला होता. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकांसह विद्यार्थी, शिक्षकांनी सकाळी प्रभात फेरी आणि दिंडी काढली होती. तालुक्यातील ७१५८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.
पहिलीत दाखल मुलांची गावातून वाजत गाजत, लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. फुगे, कागदी टोप्या, वर्गसजावट करून नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. लहानपणीच्या त्या आठवणी आणि आज प्रत्यक्ष चिमुकल्यांचा शाळेतला पहिला प्रवेश! औक्षण करुन या बालकांना विद्यार्जनासाठी प्रोत्साहित केले गेले. या नवागतांचे शाळेतील पहिले पाऊल जपून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पालक मोठ्या कौतुकाने आपल्या बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके गणवेश वाटप करण्यात आले.
कोंडगाव येथील जिल्हा परिषद आदर्श पद्मा कन्या शाळा साखरपा या शाळेत पहिलीत येणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे शाळेच्या प्रवेशद्वारात ढोलाच्या गजरात स्वागत करून त्यांचे गुलाब पुष्प व औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्याआधी सर्व विद्यार्थिनी , शिक्षक व पालक वर्ग यांच्या उपस्थित भव्य मिरवणूक काढून पहिलीत येणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत आणण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. पहिल्याच दिवशी मोफत पाठयपुस्तके, शाळेच्या ड्रेसचे वाटप, खाऊ यांचे वाटप पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे, सरपंच धनश्री जोशी, उपसरपंच श्रद्धा शेट्ये, यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित विद्यार्थिनींना करण्यात आले.
त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाला वर्षभर रुचकर-स्वादिष्ट पोषण आहार बनविणाऱ्या निधी पवार व माया मिरजकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सरपंच धनश्री जोशी यांनी सत्कार केला. घरातील महिलांना एका दिवसाचे जेवण करायला किती मेहनत घ्यावी लागते याचा विचार करून विद्यार्थिनींना वर्षभर पोषण आहार शिजवून देणाऱ्या व त्यांना तृप्त करणाऱ्या महिलांचा सत्कार करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे, सरपंच धनश्री जोशी, उपसरपंच श्रद्धा शेट्ये, सदस्या दीप्ती गांधी, साक्षी चव्हाण, नयना शिंदे, केंद्रप्रमुख दिव्या भाटकर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संतोष शिंदे, सदस्या शिल्पा सुर्वे, राजेश सावंत,जान्हवी नेवरेकर, अमिषा झगडे, मुख्याध्यापक चारुता खानविलकर मंदार आठल्ये, धनंजय लोटणकर पारस साखरे सुर्वे बहुतांश महिला पालक वर्ग, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.












