कणकवली पोलिसांच्या दोन गुन्ह्यांची उकल
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासात यश
कणकवली : कणकवली पोलीस ठाणे येथे कलम ३०३(२) अन्वये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
दरम्यान गुन्ह्यांच्या तपासावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या दोन्ही मोटारसायकल चोरीचे गुन्हे आरोपी राहुल प्रकाश बामणीकर (वय २९ वर्षे) व सुहास दत्तात्रय जाधव (वय २६ वर्षे), दोघेही रा. बामनी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांनी केल्याचे उघड झाले आहे. यापैकी एका गुन्ह्यात फोंडाघाट मारुतीवाडी येथील महादेव सुर्यकांत भोगटे यांच्या मालकीची मोटारसायकल चोरीस गेली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे २३ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील झेंडा चौक परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल तपास व चौकशी करण्यात आली असता त्यांनी दोन्ही मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जामसंडेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे व किरण देसाई यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीपणे पार पाडली.













