खारी पट्ट्यातील वीज समस्येवर शिवसेनेची धडक; महावितरणकडून आठ दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील खारी पट्ट्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाला धडक दिली. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या खेड विभागीय कार्यालयात निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
खारी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही काळापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून कोणतीही पूर्वसूचना न देता तासन्तास वीज गायब राहत असल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या वीजखंडितीमुळे दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून कृषी व लघुउद्योग क्षेत्रालाही आर्थिक फटका बसत आहे. तसेच कमी-जास्त दाबामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
शिवसेनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात खारी पट्ट्यातील वीजवाहक तारा, रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) आणि इतर यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागातील समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचीही मागणी करण्यात आली.
यावेळी महावितरणचे अधिकारी श्री. बाबरेकर यांनी निवेदनाची दखल घेत खाडीपट्टा विभागातील कर्मचाऱ्यांना तात्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच या विभागातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या पुढील आठ दिवसांत निकाली काढून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले.
खारी पट्ट्यातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी शिवसेना कायम पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, राजेश पालकर, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.