सावंतवाडी :तनया रेडकर
हॉटेल रुची डिलक्स येथे आयोजित कशाळीकर उद्योग समूहाच्या गौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि मेहनतीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व आर्थिक मदत देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सावंतवाडीतील प्रसिद्ध इंजिनिअर व उद्योजक नाना कशाळीकर यांची नात आणि इंजिनिअर अद्वैत कशाळीकर यांची कन्या कु. आद्या कशाळीकर हिच्या यशाचे विशेष कौतुक करण्यात आले.
कु. आद्या कशाळीकर हिने बेंगळुरू येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान येथून बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा ही पदवी संपादन केली आहे.
नॅचरोपॅथी आणि योग क्षेत्रात डॉक्टर पदवी मिळवणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या विद्यार्थिनींपैकी ती एक ठरली आहे. लहानपणापासून जिम्नॅस्टिक्सची आवड असल्याने तिने आरोग्य, योग आणि नैसर्गिक उपचार क्षेत्राची निवड केली.
लवकरच गोव्यात ती आपल्या सेवेला सुरुवात करणार असून मळगाव, सावंतवाडी येथील लक्ष्मी-नारायण नगर परिसरात नॅचरोपॅथी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा देणार आहे.
आद्या कशाळीकर हिच्या यशाबद्दल कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












