प्रा. सिद्धेश नेरूरकर यांचे मार्गदर्शन
सावंतवाडी :येथील मदर क्विन्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘अम्ब्रेला पेंटिंग’ (छत्री रंगवणे) कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेत शाळेतील ५५ विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेत बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी येथील प्रा. सिद्धेश नेरूरकर यांनी विद्यार्थ्यांना छत्रीवर आकर्षक रंगकाम करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक प्राध्यापक तुकाराम मोरजकर हे देखील उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, मदर क्विन्स स्कूलच्या प्राचार्या अनुजा साळगावकर, कला शिक्षक श्री. कालवणकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा वापर करत, विविध रंगसंगतींच्या माध्यमातून छत्र्यांवर अत्यंत आकर्षक व मनमोहक चित्रे साकारली. संपूर्ण कार्यशाळेत मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
या उपक्रमात बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी मृदुला ठाकूर आणि आर्या नागवेकर यांनी स्वयंसेवक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे विविध बारकावे, चित्रशैली आणि रंगसंगती समजून घेण्यास मदत केली.
या यशस्वी कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना एक उत्तम व्यासपीठ मिळाले असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा मानस शाळा प्रशासन व संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.











