सावंतवाडी:
सामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे आणि सामाजिक भान जपणारे नेतृत्व म्हणून परिचित असलेले सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत वह्यांचे वाटप केले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून समाधान व्यक्त होत आहे.
पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर हे नेहमीच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात सक्रिय असतात. दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. याच जनसंपर्कातून त्यांनी आपल्या सोनुर्ली, माजगाव आणि वेत्ये या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
याच उपक्रमाचा भाग म्हणून सोनुर्ली जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून त्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जितेंद्र गावकर यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तेंडुलकर, नागेश गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गावकर यांनी मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल आणि लावलेल्या मोलाच्या हातभराबद्दल सोनुर्ली शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले असून, या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.












