असनिये येथे घरावर माड पडून सुमारे २० हजारांचे नुकसान

केवळ दैव बलवत्तर म्हणून महिला थोडक्यात बचावली

ओटवणे । प्रतिनिधी : गेले दोन दिवस सलग पडणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा याचा फटका असनीये गावठणवाडी येथील सावित्री साबाजी सावंत यांना बसला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यामुळं त्यांच्या घराशेजारील माडाचे झाड घरावर पडून सुमारे २० ते २५ हजाराचे नुकसान झाले.

सावित्री सावंत या एकट्याच घरात राहतात. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सावित्री सावंत या घरातच झोपल्या होत्या.केवळ दैव बलवत्तर म्हणून या जीवघेण्या प्रसंगातून त्या वाचल्या. घरावर माडाचे झाड पडताच त्या धावत बाहेर आल्या. त्यानंतर सकाळी शेजाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घरावर पडलेले झाड बाजूला केले. तसेच कौलांची शाकारणी व तुटलेल्या घराची तात्पुरती दुरुस्ती केली.
आधीच मध्यमवर्गीय परिस्थिती असल्याने ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर हे मोठं संकट असून योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.