आ. दीपक केसरकर मित्रमंडळ व शिवसेनेच्यावतीने गुणवंतांचा सत्कार
सावंतवाडी :
विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण हे त्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहेत. मात्र, बदलत्या काळात केवळ गुणांवर न थांबता स्वतःमध्ये विविध कौशल्ये विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणासोबत कौशल्य आत्मसात केल्यास भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यामध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावेत. आत्मविश्वास, मेहनत आणि कौशल्य यांच्या जोरावर यशाची उंची गाठता येते, असेही संजू परब यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आ. दीपक केसरकर मित्रमंडळ व शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक काझी शहाबुद्धीन हॉल येथे उत्साहात पार पडला. शिवसेना सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आयोजित आणि माननीय शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत या सोहळ्यात तालुक्यातील दहावी-बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हा प्रमुख नीता कविटकर, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, नगरसेवक अजय गोंदावळे, अशोक दळवी, आबा केसरकर, पंचायत समिती सदस्य उत्कर्षा गावकर, प्रणाली टिळवे, परिक्षित मांजरेकर, गुरु मठकर, राकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवसेना आणि आमदार दीपक केसरकर मित्रमंडळाने आयोजित केलेला हा गुणगौरव सोहळा अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत त्यांनी या उपक्रमाचे गौरवद्गार काढले. अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची ऊर्जा मिळते, असेही त्या म्हणाल्या.
या सोहळ्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि नीता कविटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी मोलाचे मार्गदर्शन करत यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सावंतवाडी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणे तसेच त्यांना उच्च शिक्षण आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहित करणे हा होता.
या सोहळ्याला सावंतवाडी तालुक्यातील अनेक प्रशाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













