संगमेश्वर : देवरुखमध्ये रिक्षातून जाणाऱ्या वृद्धाच्या गळ्यातील ३५ हजारांची सोन्याची साखळी हिसकावून चोरटा फरार

संगमेश्वर (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरात एका ६३ वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकारणी देवरुख पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंगाराम तुकाराम शिंदे (वय ६३, रा. कोंडगाव शिंदेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांना एका अनोळखी चोरट्याने ‘रिक्षाचे भाडे आहे’ असे सांगून फोन केला होता. त्यानंतर रिक्षात बसून जात असताना, दिनांक २९/०६/२०२६ रोजी संध्याकाळी १८.१५ ते १९.१५ च्या सुमारास मोर्डे खिंड ते ढवळवाडी जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. मोर्डे खिंड येथून सुमारे २०० मीटर अंतरावर आले असता, अनोळखी चोरट्याने रिक्षा थांबवण्यास सांगितली. रिक्षा थांबताच त्याने फिर्यादी गंगाराम शिंदे यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची, डिझाईन व बदाम आकाराचे पान असलेली सोन्याची चैन हाताने पकडून जोरात हिसका मारून खेचली आणि रिक्षातून खाली उतरून पळ काढला.
​या चोरीच्या घटनेत सुमारे ३५,०००/- रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ३०/०६/२०२६ रोजी पहाटे ०५.०८ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत