सावंतवाडी माठेवाड्यात संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्याने घरात पाणी शिरले

८१ वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक अडकले घरात

नगराध्यक्षांची धाव : अधिकारीही घटनास्थळी दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी :
शहरात बुधवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे माठेवाडा, आत्मेश्वर मंदिर मागील डॉ. साईल यांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले. संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्याने हा प्रकार घडला असून, यात ८१ वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत आकेरकर घरातच अडकून पडले होते. त्यांच्या घरात व खळ्यात गुडघाभर पाणी साचले होते. नळपाणी योजनेच्या ठेकेदाराने रस्ता खोदताना या मोरीला धक्का पोहोचवल्याने पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होऊन हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.
​या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. “याबाबत यापूर्वी कल्पना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले, मी औषधोपचारासाठी येथे राहतो, या वयात मी कसे जगायचे?” अशी उद्विग्न कैफियत ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत आकेरकर यांनी मांडली. यावर नगराध्यक्षांनी आकेरकर यांना धीर देत, साचलेले पाणी तात्काळ बाहेर काढून ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, ​आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी सांगितले की, मुख्य तिठ्यावरील प्रकार असल्याने वाहतुकीस अडचण येऊ न देता आजच्या दिवसात हा प्रश्न सोडवला जाईल. प्रशासनाच्या तत्परतेबद्दल श्री. आकेरकर यांनी नगराध्यक्षा व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि ही समस्या दूर होईल असा विश्वास व्यक्त केला.
​याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेविका दुलारी रांगणेकर, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, बांधकाम अभियंता तुषार सरडे, दीपक म्हापसेकर (आरोग्य विभाग), प्राजक्ता कांबळे (पाणी पुरवठा), मनोज राऊळ, शिवम भिसे, सुमित वारंग तसेच स्थानिक नागरिक नंदू गावडे, बाबल्या दुभाषी, पुंडलिक दळवी, गौरांग चिटणीस आदी उपस्थित होते.