वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारार्थी अनंत खांबे यांचा वाशिष्ठी डेअरीर्फे सत्कार

कोकणवासीय म्हणून आपला अभिमान वाटतो; प्रशांत यादव यांनी व्यक्त केली भावना!

चिपळूण (प्रतिनिधी):- तालुक्यातील मांडकी येथील प्रयोगशील शेतकरी अनंत बाबाजी खांबे यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष तथा रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्री. खांबे यांचा यथोचित सत्कार केला. हा सत्कार कार्यक्रम कृष्णेश्वर नगर, पाग चिपळूण भाजपा जनसंपर्क कार्यालयात झाला.

यावेळी प्रशांत यादव यांनी शेतीच्या क्षेत्रात आपल्या हातून असेच नवनवीन प्रयोग घडत राहोत, अशा शुभेच्छा दिल्या. ‘शेती तोट्याची नाही, नियोजनाची गरज आहे’ हा मोलाचा संदेश आपण आपल्या कृतीतून दिला आहे. त्यामुळे कोकणवासीय म्हणून आपला अभिमान वाटतो, असेही आधोरेखित केले.

यावेळी ते म्हणाले की, आपल्यासाठी शेती ही केवळ पोटापाण्याचे साधन नाही, तर ती प्रयोगशाळा आहे. पारंपरिक पिकांसोबत नवनवीन तंत्रज्ञान, सेंद्रिय पद्धती आणि शेतीपूरक व्यवसाय यांची यशस्वी सांगड आपण घातली आहे. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून न राहता माती परीक्षण, ठिबक सिंचन, एकात्मिक कीड व्यवस्थापन यांसारख्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून आपण उत्पादनात कमालीची वाढ केली आहे. त्यामुळे आपले कृषी क्षेत्रातील योगदान आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आपल्या शेतीनिष्ठेला मिळालेली खरी पावती आहे, असेही नमूद केले.

आजच्या काळात तरुण शेतीपासून दूर जात असताना आपल्यासारखे प्रयोगशील शेतकरी ही कोकणाची आशा आहेत. कारण आपण शेतीला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. तसेच आपल्या पाठीवर शासनाने टाकलेल्या शाबासकीच्या थापीमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल आणि आधुनिक शेतीकडे वळण्याचे बळ मिळेल. शिवाय आपले कष्ट, चिकाटी आणि नाविन्याची कास धरणारा स्वभाव पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असाही विश्वास यावेळी वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष तथा रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर आणि खांबे कुटुंबीय आदी उपस्थित होते.