नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह माजी नगराध्यक्ष रंगले कॅरम स्पर्धेत
स्पर्धेत ५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी नगरपरिषदेकडून पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चा शानदार शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानाकडील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये राजेसाहेब खेमसावंत भोंसले आणि राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या भव्य स्पर्धेत जिल्हाभरातून जवळपास ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
या चषकाअंतर्गत कॅरम, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा विविध इनडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले की, या भव्यदिव्य नगराध्यक्ष चषकाच्या माध्यमातून रामराजा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे मोठे कार्य होत आहे. यासाठी त्यांनी क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांचे विशेष कौतुक केले. तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी बापूसाहेब महाराजांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासह स्थानिक क्रीडा गुणांना हक्काचे व्यासपीठ व वाव देण्याचे काम यानिमित्ताने होत असल्याचे उद्गार काढले.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, शालेय अभ्यासक्रमासह खेळात निपूण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या चषकाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा जोपासण्याचा नगरपरिषदेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. दरम्यान, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी देखील आयोजकांच्या संकल्पनेचे कौतुक करत स्पर्धक विद्यार्थ्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या.
राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हटले की, सावंतवाडीतून अनेक खेळाडू क्रीडा क्षेत्रात घडले असून त्यांनी राज्यात व देशात शहराचा नावलौकिक प्राप्त केला आहे. येथील खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच स्पर्धांच्या परीक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या भव्य शुभारंभ प्रसंगी राजेसाहेब खेम सावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, महिला सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेवक दुलारी रांगणेकर, निलम नाईक, ॲड. सायली दुभाषी, सुकन्या टोपले, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देवा टेमकर, सुनिता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक यांच्यासह चित्रकार अक्षय सावंत, संतोष मोरजकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित व इतर नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी केले. सूत्रसंचालन गजानन परब यांनी केले, तर उपस्थितांचे आभार क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांनी मानले.
*नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह माजी नगराध्यक्ष रंगले स्पर्धेत*
दरम्यान या क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभ नंतर दस्तूर खुद्द नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांच्यासह उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनीही या स्पर्धांचा आनंद लुटला. टेबल टेनिस तसेच कॅरम स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. कॅरम स्पर्धेत नगराध्यक्षांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष हे एकत्र बसले. माजी नगराध्यक्षांच्या धुरंदर खेळीला विद्यमान नगराध्यक्षांनी कडवी झुंज दिली. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक व क्रीडा प्रेमींचे मोठे मनोरंजन झाले.













