महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई यांचे प्रतिपादन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
माझ्या विरोधात अनेक षडयंत्रे रचण्यात आली होती. सावंतवाडीत बाहेरची व्यक्ती येऊन माझ्या विरोधात वकिलांना भडकवण्याचे काम करत होती. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एकीचे बळ दाखवले. त्यातही सावंतवाडी वकील संघटनेची एकी आगळीवेगळी ठरली. येथील सर्व वकील या षडयंत्राला पुरून उरले आणि त्यांनी विरोधकांचे मनसुबे हाणून पाडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला सर्वाधिक मताधिक्य सावंतवाडीतून मिळाले असून, मी येथील सर्व वकील बांधवांचा ऋणी आहे, असे भावोद्गार बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे नवनिर्वाचित सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी काढले.
दरम्यान, अशीच एकी कायम ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांच्या हितासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने शनिवारी सावंतवाडी वकील संघटनेच्या चेंबरमध्ये ॲड. संग्राम देसाई यांच्या गौरवार्थ सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सत्कार मूर्ती ॲड. देसाई यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. सुभाष पणदूरकर, तालुका अध्यक्ष ॲड. बालाजी रणशूर यांच्यासह तालुका बार असोसिएशनचे बहुतांश सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक काळातील घडामोडींवर प्रकाश टाकत ॲड. देसाई यांनी सावंतवाडीतील वकिलांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.













