पुराच्या पाण्याची जवाहर चौकात धडक, जनजीवन विस्कळीत
जवाहर चौकातील एसटी वाहतुक बंद
ग्रामीण भागातही पावसाचा जोर, अनेक भागात पडझड व विजपुरवठा खंडीत
राजापूर । प्रतिनिधी
शनिवारी दिवसभर व रात्री मुसळधार पडलेल्या पावसामुळे राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. रविवारी सकाळी या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाकडे कुच करत जवाहर चौकात धडक दिली आहे. शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी जवाहर चौकात आल्याने जवाहर चौकात येणारी एसटी वाहतुक बंद करण्यात आली आहे. जवाहर चौकातील टपऱ्याही पाण्याखाली गेल्या आहेत. तर राजापूर, शिळ, गोठणेदोनिवडे मार्गावरही अर्जुनेच्या पुराचे पाणी आल्याने हा मार्गावरिल वाहतुक ठप्प झाली आहे. शहरातील बंदरधक्का, गणेशघाट परिसरही पाण्याखाली गेला असून या मार्गावरिल वाहतुकही ठप्प झाली आहे.
गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी घरे, गोठयांसह झाडांची पडझड झाली असून अनेक भागात विजपुरवठाही ठप्प झाला आहे. तर अतिवृष्टीमुळे कशेळी देवघळी बीच सनसेट पॉईट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
संततधार पडणाऱ्या पावसामुळे पुराचा धोका लक्षात घेता शहरातील नदीकिनाऱ्यावरिल व्यापारी व नागरिक सतर्क झाले होते. त्यांनी शनिवार पासूनच आपल्या सामानाची आवराआवर केली होती. त्यामुळे कोणतेही नुकसान झालेले आहे.
तालुक्यात ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाला आहे. नाटे बाणेवाडी मध्ये भागीरथी काशिनाथ चव्हाण यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे व पोकळेवाडी पर्यंत जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. कातळी गावात अ. रहीम अ लतिफ सोलकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने त्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. राजापूर गोठणे दोनिवडे सौंदळ रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे त्यामुळे सदरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पन्हाळे तर्फे राजापूर बौद्धवाडी येथे वीज पुरवठा करणारी वीज वाहिनी तुटून पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे.
संततधार पडणारा पाऊस व राजापूर शहरात निर्माण झालेली पुरपरिस्थितीच्या पार्श्व भूमीवर प्रशासनही सतर्क झाले आहे.













