प्रकल्प समर्थनासाठी युवा शक्ती रस्त्यावर; ‘आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा’चा बुलंद आवाज

देवगड : मुसळधार पावसाची तमा न बाळगता देवगडच्या युवकांनी आज विकास, रोजगार आणि  प्रकल्पांच्या समर्थनार्थ एक उत्स्फूर्त मोटारसायकल रॅली काढत आपली भूमिका ठामपणे मांडली. “आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा… आम्ही देवगड सोडणार नाही… पर्यावरणपूरक प्रकल्प झालाच पाहिजे…” अशा बुलंद घोषणांनी आज देवगडची हवा दणाणून गेली.

  • यामध्ये   ललित चांदोसकर, सिद्धेश माणगावकर, आर्यन माने, दीपक जानकर, ओंकार सारंग, निशांत शिंदे, हर्ष शेटये, ओंकार तावडे, शैल पांचाळ, आशिष जाधव, उदय पालेकर, राजन घाडी, मकरंद सावंत, उमर सोलकर, कृष्णा कोंडकर, श्रीकांत चव्हाण, विराज तेली, सत्येन जामसांडेकरललित चांदोसकर, सिद्धेश माणगावकर, आर्यन माने, दीपक जानकर, ओंकार सारंग, निशांत शिंदे, हर्ष शेटये, ओंकार तावडे, शैल पांचाळ, आशिष जाधव, उदय पालेकर, राजन घाडी, मकरंद सावंत, उमर सोलकर, कृष्णा कोंडकर, श्रीकांत चव्हाण, विराज तेली, सत्येन जामसांडेकर, परिमल नलावडे, शुभम महाजन, जितेश मोहिते, जयराज राजम, श्रवण माळी, दीप नलावडे, मनीष तेंडुलकर, जयेश पारकर, मोहित बंगरे, सर्वेश सकपाळ, साहिल लाड, राशील जाधव, विक्रम रायका, सोहम माने, साहिल सावंत, खुशल कदम, दुर्गेश साठे.. याच्यासह शेकडो युवक सामील झाले होते.

जामसंडे येथील दिर्बादेवी मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली शुक्रवार बाजारपेठ मार्गे देवगड शहरात पोहोचली. भर पावसातही मोठ्या संख्येने युवक या रॅलीत सहभागी झाले होते. हातात घोषणाफलक आणि अंगावर “आम्हाला देवगडमध्ये रोजगार हवा” असा संदेश लिहिलेले रेनकोट परिधान करून युवकांनी आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या.

या रॅलीत अनेक युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. पर्यावरणाचा समतोल राखत विकास साधणारे प्रकल्प उभे राहावेत आणि स्थानिक युवकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी ठाम भूमिका यावेळी सहभागी युवकांनी मांडली.

भरधाव पावसातही युवकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. उलट, त्यांच्या घोषणांनी आणि शिस्तबद्ध रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनातून देवगडच्या नव्या पिढीचा आपल्या मातीत राहून प्रगती करण्याचा निर्धार स्पष्टपणे दिसून आला.

या रॅलीद्वारे प्रकल्पांच्या समर्थनार्थ युवकांनी आपली सहमती जाहीर करत, “रोजगारासाठी स्थलांतर नव्हे, तर विकास आपल्या गावातच हवा,” असा भावनिक आणि आश्वासक संदेश दिला. देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यावरणपूरक उद्योग उभे राहावेत आणि स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळावे, हीच आजच्या युवा पिढीची अपेक्षा असल्याचे या रॅलीतून अधोरेखित झाले.