धुक्याची दुलई अन फेसाळणारे धबधबे; वर्षापर्यटनाच्या पहिल्याच रविवारी ‘मागेली’ पर्यटकांच्या गर्दीने न्हाली!

​दोडामार्ग |सुहास देसाई :
गेल्या आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर वसलेल्या तसेच कोकणाचे शेवटचे टोक मानल्या जाणाऱ्या मागेली आणि तिलारी परिसराला जणू निसर्गाचे लेणे बहाल केले आहे. हिरवेगार डोंगर, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि पूर्ण ताकदीने ओसंडून वाहणारे विहंगम धबधबे यामुळे मागेलीचा निसर्ग पुन्हा एकदा पूर्ण वैभवाने बहरला आहे. वर्षापर्यटनाचा (Monsoon Tourism) पहिलाच रविवार असल्याने या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रासह, गोवा आणि कर्नाटक राज्यातील पर्यटकांनी मागेलीत अभूतपूर्व गर्दी केली होती.
​निसर्गाच्या रौद्र अन् देखण्या रूपाचा आनंद उंच कड्यांवरून फेसाळत आणि दुधासारखे पांढरे शुभ्र रूप घेऊन जमिनीच्या दिशेने झेपावणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. मुख्य धबधब्याच्या अगदी मुळाशी जाऊन निसर्गाच्या या रौद्र आणि देखण्या रूपाचा आनंद लुटण्यात पुरुषांच्या बरोबरीने महिला आणि लहान मुलांनीही आघाडी घेतली होती.
​रिल्स आणि फोटोग्राफीची स्पर्धा
​या थरारक आणि आल्हाददायक क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तरुण-तरुणींमध्ये फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडिया रिल्स बनवण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मुख्य धबधब्यासोबतच परिसरातील खोकराल, बोकारवाडी पॉईंट, मागेली धार आणि घाटमार्गातील लहान-मोठ्या जलप्रपातांवर पर्यटकांनी सचैल स्नानाचा मनमुराद आनंद लुटला. काही निसर्गप्रेमी कुटुंबांनी मात्र मुख्य ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी अंतर्गत भागातील शांत धबधब्यांचा आसरा घेत आपला वीकेंड साजरा केला.
​पर्यटकांची गर्दी आणि पोलिसांची दमछाक :
पर्यटकांच्या सोयीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीने पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली होती. मात्र, काही अतिउत्साही पर्यटकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे पार्क केल्यामुळे घाटमाथ्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तरीही वाहनांच्या गर्दीमुळे पोलिसांची मोठी दमछाक झाली.
​धुक्याची चादर आणि गरमागरम खाद्यभ्रमंती
​निसर्गाच्या या अद्भुत रूपाला रविवारी दाट धुक्याची जोड मिळाली होती. संपूर्ण दरी आणि घाट रस्ता धुक्याच्या शुभ्र चादरीत वेढला गेल्याने समोरील वाहन दिसणेही कठीण झाले होते. या वातावरणात चिंब भिजत गरमागरम चहा, वाफाळलेला वडापाव, भजी आणि मक्याच्या कणसांचा आस्वाद घेताना पर्यटक दिसत होते. रविवारचा मुहूर्त आणि जोडीला कोसळणारा धो-धो पाऊस यामुळे अनेक खवय्यांनी कोकणी पद्धतीच्या चवदार मांसाहारी जेवणावर ताव मारण्यास पसंती दिली.
​एकंदरीत, धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे आणि पर्यटकांचा अलोट उत्साह यांमुळे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मागेली आणि आंबोली घाट परिसर पुन्हा एकदा पर्यटनासाठी पूर्णपणे सज्ज झाला असून वर्षापर्यटनाचा पहिला रविवार पर्यटकांनी धुमधडाक्यात गाजवला आहे