‘शहराच्या हक्काच्या जागेचे नुकसान सहन करणार नाही; मुख्याधिकारी औंधकरांवर कारवाईची मागणी’
कुडाळ प्रतिनिधी : हिंदू कॉलनी येथील शहराच्या हक्काची तब्बल १४१ गुंठे जागा नगरपंचायतीच्या हातून गेल्याप्रकरणी नगरसेविका संध्या तेरसे यांनी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान नगरपंचायत प्रशासनावर जोरदार टीका करत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. शहराच्या हिताशी संबंधित एवढ्या महत्त्वाच्या विषयात प्रशासनाने निष्क्रिय भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
तेरसे म्हणाल्या, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी ना हरकत दाखला दिल्यामुळे नगरपंचायतीच्या मालकीची १४१ गुंठे जागा हातातून गेली. या जागेवर सुमारे साडेतीन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून तिची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. त्यामुळे शहराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे.
या प्रकरणात नगरपंचायतीने उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करणे आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक ठराव करून तो नगरपंचायतीच्या वकिलांकडे पाठविण्याबाबत वकिलांनी प्रशासनाला पत्रही दिले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ६ जुलै रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या सभेतही एवढ्या महत्त्वाच्या विषयावर गांभीर्याने चर्चा झाली नसल्याने प्रशासनाला शहराच्या हिताची कोणतीही आस्था नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिवसभर उपोषण सुरू असताना मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन शहराच्या हितासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता पुढील सात दिवसांनी सभा बोलावण्याची घोषणा करण्यात आली. ही केवळ दिरंगाई असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्याधिकारी औंधकर यांनी कितीही प्रयत्न केले तरी या प्रकरणात आम्ही कायदेशीर लढाई लढणार असून त्यांच्याकडून झालेला कथित गैरव्यवहार जनतेसमोर आणणार आहोत. केवळ बदली नव्हे, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच त्यांच्या निर्णयामुळे शहराचे झालेले नुकसान शासनाने त्यांच्याकडून वसूल करावे, अशी मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरणार असल्याचे तेरसे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपोषण स्थळी दिवसभर कुडाळ शहरातील स्थानिक नागरिकांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी नगरसेवकांनी
उपोषणाला उपस्थिती दर्शवली होती. शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.










