मानसिक, शारीरिक, आर्थिक छळासह बुवाबाजीचे आरोप; पीडितेला संरक्षण देण्याची मागणी
लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी’; महिला नेत्या तन्वी चांदोस्कर यांचा सवाल
‘स्वतःच्या घरातील महिलेलाच न्याय नाही, मग समाजाला काय न्याय देणार?’ – प्रियांका साळस्कर यांचा घणाघात
देवगड-जामसांडेत पत्रकार परिषद; निष्पक्ष तपास व कठोर कारवाईची मागणी
देवगड : माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या नगरसेवक पुत्राविरोधात सुनेने विरार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमधील गंभीर आरोपांवरून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत निष्पक्ष चौकशी व पीडितेला संपूर्ण संरक्षण देण्याची जोरदार मागणी केली. देवगड-जामसांडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर आणि भाजपच्या महिला नेत्या प्रियांका साळस्कर यांनी पत्रकार परिषद घेत राऊत कुटुंबावर थेट निशाणा साधला.
यावेळी पंचायत समिती सदस्या स्नेहा अनुभवणे आणि माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी उपस्थित होत्या.
पत्रकार परिषदेत बोलताना तन्वी चांदोस्कर यांनी सांगितले की, विरार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये विनायक राऊत, त्यांचे नगरसेवक पुत्र आणि इतर संबंधितांविरोधात मानसिक, शारीरिक, आर्थिक छळासह बुवाबाजी व फसवणुकीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित महिलेला तातडीने सुरक्षा देऊन कोणताही राजकीय दबाव न येऊ देता निष्पक्ष तपास व्हावा, अशी त्यांनी मागणी केली.
“इतकी वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्तींवर असे गंभीर आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नैतिकतेचा विचार करून संबंधितांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कायद्याने कोणताही भेदभाव न करता दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे,” असे चांदोस्कर यांनी स्पष्ट केले.
भाजप महिला नेत्या प्रियांका साळस्कर यांनीही अत्यंत आक्रमक शब्दांत राऊत कुटुंबावर टीका केली. “स्वतःच्या कुटुंबातील महिलेलाच मान-सन्मान आणि न्याय देता येत नसेल, तर समाजातील महिलांसाठी काम करण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. एका महिलेला इतक्या प्रकारे त्रास दिल्याचे आरोप अत्यंत संतापजनक असून दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” असा घणाघात त्यांनी केला.
महिलांवर अन्याय झाल्यास भारतीय जनता पार्टी महिला आघाडी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा पुनरुच्चार करत पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
भाजप महिला आघाडीने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, कोणत्याही दबावाखाली न येता कायद्याने आपले काम करावे, असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले.











