उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार ; प्रकृती स्थिर
सावंतवाडी:येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या निलेश आरेकर खानावळ येथे काम करणाऱ्या सौ. समीक्षा संतोष परब (वय ४०, रा. कारिवडे पेडवेवाडी) यांना रविवार, दि. १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या पटांगणात काम करत असताना अचानक सर्पदंश झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटना घडताच हॉटेल मालक निलेश आरेकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता सौ. परब यांना रुग्णालयात आणले. सर्पदंशामुळे महिला व त्यांचे नातेवाईक अत्यंत भयभीत झाले होते. यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेले जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
रुग्णालयातील डॉ. वैभव मारुती बदरवाड (MBBS) व डॉ. सभा खान (MBBS) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिकेत गुरव (MBBS) यांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले. रुग्णाची लॅब व मॅन्युअल पद्धतीने तातडीने रक्त तपासणी करण्यात आली. सुदैवाने, या अहवालातून रुग्णाला कोणतीही गंभीर विषबाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी आवश्यक ती सर्व इंजेक्शन व औषधोपचार सुरू केले आहेत.
यानंतर जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे संयोजक श्री. रवी जाधव यांनी रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली, तसेच डॉक्टरांना योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली. गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी हे प्रतिष्ठान नेहमीच तत्पर असते. ऐनवेळी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल राजू मसुरकर यांनी हॉटेल मालक व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.











