विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण करणारा ‘मल्टी स्किल कोर्स’!

▪️बागवे हायस्कूल मसुरे येथे कोर्सच्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

मसुरे | झुंजार पेडणेकर
कॉज टू कनेक्ट संस्थेच्या माध्यमातून आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे मागील तीन वर्षांपासून राबविण्यात आलेल्या मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स अंतर्गत बहुविध कौशल्य अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सन २०२३ पासून या शाळेमध्ये मल्टी स्किल फाउंडेशन कोर्सची सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीवर आधारित, कौशल्य शिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद,मुख्याध्यापी का, शाळा समन्वयक,मल्टी स्किल विभागातील सर्व निदेशक, इयत्ता आठवी ,नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर अभ्यासक्रमात उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
या वेळी उपक्रमाची प्रस्तावना योगिता सोहनी मॅडम यांनी सादर केली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मसुरेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या मेहनतीचे कौतुक करत मल्टी स्किल अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, शिस्त आणि प्रत्यक्ष काम करण्याची वृत्ती विकसित झाल्याचे सांगितले. मल्टी स्किल च्या सर्व शिक्षकांचे देखील खूप कौतुक केले.
त्यानंतर शाळा समन्वयक रमेश पाताडे सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ प्रमाणपत्र मिळविण्यापुरते न थांबता या अभ्यासक्रमातून मिळालेली कौशल्ये आयुष्यात उपयोगात आणून स्वावलंबी आणि सक्षम नागरिक बनावे, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केले.
कॉज टू कनेक्ट संस्थेचे आभार मानत विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमातून घेतलेले अनुभव त्यांच्या भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच भविष्यातही अशाच कौशल्याधारित उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.