रायगड : रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक बदली प्रकरणावरून लाचखोरीचा आरोप समोर आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक योगेश कुमार भस्मे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शिक्षकाच्या बदलीमध्ये बदल करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, याच तक्रारीच्या आधारे बुधवारी सायंकाळी सापळा रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
योगेश कुमार भस्मे हे रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. तसेच ते जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पाहत असल्याचे सांगण्यात येते. शिक्षक बदलीशी संबंधित प्रकरणात वरिष्ठांसाठी रक्कम गोळा केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल्याची माहिती आहे.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना भस्मे यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे रायगड जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नेमकी किती रकमेची मागणी करण्यात आली होती, ही रक्कम कोणाकडून मागण्यात आली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.












