एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग’ कार्यशाळा संपन्न

 

कणकवली:विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता नवनवीन कौशल्ये शिकून त्यावर काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रिन्सिपल डॉक्टर डी. एस. बाडकर यांनी केले. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिक विभाग तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसांच्या विद्यार्थी विकास कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते.

मेकॅनिकल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “Additive manufacturing – Recent Trends And Future Perspective” (ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग – रिसेंट ट्रेंड्स अँड फ्युचर परस्पेक्टिव्ह) या विषयावर सहा दिवसांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला था. या कार्यक्रमाचा महाविद्यालयातील ५८ विद्यार्थ्यांनी यशस्वी लाभ घेतला.

या सहा दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना टू-डी (2D) ड्रॉईंग, थ्री-डी (3D) ड्रॉईंग, सॉलिड मॉडेलिंग तसेच थ्री-डी प्रिंटिंगसाठी आवश्यक असणाऱ्या फॉरमॅटमध्ये फाईल्स कशा बदलाव्या, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केवळ थेअरी न शिकवता, प्रत्यक्ष थ्री-डी प्रिंटिंग करण्याचे प्रॅक्टिकलही विद्यार्थ्यांनी पूर्ण केले.

या कार्यक्रमासाठी राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉक्टर सचिन खोत यांनी विशेष तज्ञ प्राध्यापक म्हणून उपस्थित राहून तीन दिवस विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक विशाल धोपेश्वरकर, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक ओंकार साळवी आणि प्राध्यापक हर्ष घाडीगावकर यांनीही विविध सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी प्राध्यापक डॉ. कुलकर्णी आणि मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक सचिन वंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर प्रिन्सिपल डॉक्टर डी. एस. बाडकर यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक माननीय नारायणराव राणे, सौ. नीलमताई राणे, आमदार डॉ. निलेश राणे आणि मंत्री ना. नितेश राणे यांनी डिजिटल माध्यमातून व संदेशाद्वारे महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

सहा दिवसांच्या या कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानभिमुख आयोजनाबद्दल आणि मिळालेल्या उत्कृष्ट प्रॅक्टिकल माहितीबद्दल विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व प्राध्यापकांचे आभार मानले.