नांदेड – जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वरिष्ठांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी संबंधित शिक्षकाने व्हॉट्सअॅप स्टेटसवर आपली मानसिक वेदना व्यक्त करणारा संदेशही ठेवला होता.
मृत शिक्षकाचे नाव सुनील मुळे असून, त्यांनी नांदेडजवळील पुणेगाव येथील गोदावरी नदीपात्रात पत्नी, मुलगा आणि मुलीसह उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.













