नाशिक : येवला तालुक्यात यंदाच्या पावसानंतर मका, बाजरी, सोयाबीन आणि कापूस पिकांची पेरणी पूर्ण झाली असून आता शेतकरी कोळपणीच्या कामात व्यस्त आहेत. वाढती मजुरी आणि कृषी अवजारांच्या वाढलेल्या किमतीमुळे अनेक शेतकरी कमी खर्चातील देशी जुगाडाचा आधार घेत आहेत. सायकलीच्या साहाय्याने तयार केलेल्या उपकरणातून कोळपणीचा अनोखा प्रयोग सध्या येवला तालुक्यात पाहायला मिळत आहे.
पिकांची उगवण झाल्यानंतर तण नियंत्रण आणि पिकांच्या चांगल्या वाढीसाठी वेळेवर कोळपणी करणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, मजुरीचे वाढते दर आणि आधुनिक कृषी अवजारांचा खर्च परवडत नसल्याने येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी देशी जुगाडाचा मार्ग स्वीकारला आहे.
जुन्या सायकलीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या उपकरणाच्या मदतीने कमी खर्चात आणि कमी वेळेत कोळपणीचे काम केले जात आहे. त्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत होत असून शेतकऱ्यांना कामही अधिक सुलभ होत आहे.कृषी क्षेत्रात पारंपरिक अनुभव आणि स्थानिक कल्पकतेची जोड देत येवला तालुक्यातील शेतकरी अशा देशी जुगाडांचा प्रभावी वापर करत असून, हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.













