संगमेश्वर एसटी स्थानकात ‘एनसीएमसी’ कार्डसाठी लाभार्थ्यांची तुफान गर्दी

देवरूखचे हेलपाटे वाचल्याने प्रवाशांना मोठा दिलासा; ऐन पावसाळा अन् शेतीच्या हंगामात वेळ अन् पैशांची बचत

देवरूख (प्रतिनिधी):

राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या प्रवासात सुलभता आणणाऱ्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ वितरणासाठी संगमेश्वर एसटी बसस्थानक परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या केंद्रावर सध्या परिसरातील नागरिक आणि प्रवाशांची अक्षरशः तुफान गर्दी उसळत आहे. यापूर्वी हे कार्ड काढण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास सहन करत देवरुख येथील केंद्रावर खेटे घालावे लागत होते. मात्र, संगमेश्वर एसटी बसस्थानकातच ही सुविधा प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे नागरिकांच्या त्रासाला पूर्णविराम मिळाला असून, सर्वसामान्यांचे वेळ आणि पैसे दोन्ही वाचत असल्याने प्रवाशांमधून प्रचंड समाधान व्यक्त केले जात आहे.

​यापूर्वी संगमेश्वर शहर व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी देवरुख येथील केंद्रावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे दूर अंतरावरून प्रवास करताना नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असे. त्यातच देवरुख केंद्रावर होणारी अलोट गर्दी आणि वेळेचे बंधन यामुळे अनेकदा दिवसभर ताटकळत राहूनही वेळ संपल्यावर नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत होते. विशेषतः सध्या ऐन पावसाळ्याचे दिवस असून शेतीचा हंगाम अंतिम टप्प्यात किंवा ऐन धावपळीत असताना या कार्डसाठी नागरिकांची मोठी परवड होत होती. एका कार्डसाठी संपूर्ण दिवस वाया घालवणे शेतकरी व कष्टकऱ्यांना परवडणारे नव्हते.

​मात्र, संगमेश्वर एसटी स्थानकात हे केंद्र कार्यान्वित झाल्याने या सर्व समस्यांवर कायमचा तोडगा निघाला आहे. आता संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या अनेक गावांतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या केंद्रावर कार्ड काढण्यासाठी उत्स्फूर्तपणे गर्दी करत आहेत. शासनाने नेमून दिलेल्या अवघ्या १९९ रुपये या अधिकृत शुल्कात हे कार्ड नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. ​हे केंद्र सकाळी ९:३० ते दुपारी ३:३० या वेळेत सुरू राहत असून, आठवड्यातून गुरुवार आणि रविवार हे दोन दिवस वगळता इतर सर्व दिवशी नागरिकांना ही सेवा सुरळीतपणे पुरवली जात आहे. स्थानिक पातळीवरच एसटी प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ऐन पावसाळ्यात होणारी मोठी पायपीट थांबली असून संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.