पनवेल रेल्वे स्थानकात मोठी कारवाई! एसी डब्यांमध्ये चोरी करणारा सराईत चोर अखेर जेरबंद

 

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी अटकेत

पनवेल रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी एसी डब्यांमध्ये चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपी रेल्वेने प्रवास करून चोरी करत असे आणि पुढील स्थानकावर उतरून विमानाने पसार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या आरोपीवर विविध राज्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून इतर गुन्ह्यांशीही त्याचा संबंध तपासला जात आहे.


बॅग तपासणीदरम्यान चोरीचा मुद्देमाल जप्त

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी केलेल्या सतर्क कारवाईत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रघु सुमन खोसला (वय ४१) याला अटक करण्यात आली. नियमित सीसीटीव्ही निरीक्षण आणि अँटी-सॅबोटेज तपासणी सुरू असताना १७ जुलै रोजी मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून उतरताना त्याची हालचाल संशयास्पद वाटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आढळून आले.

चौकशीदरम्यान आरोपीला त्या दागिन्यांबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यानंतर अधिक तपासात हे दागिने केरळला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या हँडबॅगमधून चोरी केल्याचे समोर आले. त्या बॅगेत सोने-चांदीचे दागिने तसेच आयफोनही होता. हा चोरीचा प्रकार कर्नाटकातील कारवार स्थानकाजवळ घडला होता आणि याबाबत गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जप्त केलेला मुद्देमाल संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोपीवर ३९ गुन्हे, बीएनएस अंतर्गत कारवाई

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, रघु सुमन खोसला याच्यावर मुंबई रेल्वे नेटवर्कसह विविध राज्यांमध्ये चोरी आणि इतर गुन्ह्यांचे एकूण ३९ गुन्हे दाखल आहेत. तो प्रामुख्याने एक्स्प्रेस रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये चोरी करून पुढील स्थानकावर उतरायचा आणि त्यानंतर विमानाने प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी निघून जात असल्याचे तपासात समोर आले आहे. रेल्वे पोलिसांकडून त्याच्यावर बराच काळ लक्ष ठेवण्यात आले होते.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून जप्त केलेले सोने-चांदीचे दागिने पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे पोलिस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.