हिंदळे भंडारवाडा शाळेत भक्तिमय दिंडी सोहळा!

मसुरे | झुंजार पेडणेकर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, हिंदळे भंडारवाडा येथे शनिवारी सकाळी दिंडी सोहळा, अभंग व भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. हिंदळे ग्रामोन्नती मंडळ आणि शाळा यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि विठ्ठल नामस्मरणात दिंडी काढली. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अंगणवाडीतील चिमुकल्यांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग व भक्तिगीतांनी उपस्थितांना विठ्ठलभक्तीचा आनंद अनुभवायला मिळाला.

यावेळी सरपंच श्री. मकरंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजविण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.यावेळी शाळा समिती पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पालक आदी उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.