विजयदुर्ग विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्सव उत्साहात संपन्न

जुनी बाजारपेठ आणि गोपाळकृष्णवाडीच्या दिंड्या दाखल

विजयदुर्ग ( प्रतिनिधी) : २२ तारखेपासून सुरू झालेल्या विजयदुर्ग येथील विठ्ठल मंदिरातील आषाढी हरिनाम सप्ताहामध्ये आज आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी प्रतिवर्षाप्रमाणे येणारी जुनी बाजारपेठ येथील नारूची दिंडी मंदिरामध्ये दाखल झाली. याचबरोबर यंदा गोपाळकृष्णवाडी प्रहरकरी मंडळींचा दिंडी उत्सव असल्याने त्यांनीही आकर्षक स्वरूपात आपली दिंडी मंदिरामध्ये आणली. यावेळी दोन्ही वाडीतील विठ्ठलभक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले होते.

दरम्यान, मंदिराच्या भोवती पालखी फिरवून आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत सर्व विठ्ठलभक्तांनी विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाचा भक्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विठ्ठल मंदिर उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेश बिडये याचबरोबर सचिव संजय सावंत, खजिनदार दीपक करंजे आणि असंख्य उत्सव समितीच्या सदस्यांनी आणि विजयदुर्गवासीयांनी विठ्ठल मंदिरातील आषाढी हरिनाम सप्ताहामध्ये संपन्न होणारा आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.

या सप्ताहामध्ये विठ्ठलवाडी, गोपाळकृष्णवाडी, भानुदास, चाफेगल्ली, चौगचारवाडी, वाड्ये वठार आणि महिला मंडळ हे प्रहरकरी सामील झाले आहेत. दरम्यान, बुधवारी या आषाढी सप्ताहाची सांगता संपूर्ण गावांमध्ये दहीहंड्या फोडून आणि दिंडी फिरवून होणार आहे. या समारोपाचा लाभही सर्व विठ्ठलभक्तानी घ्यावा असं आवाहन विठ्ठल मंदिर उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेश बिड्ये यांनी केले आहे.