सिंधू बँक स्टाफ सोसायटीची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

सभासदांसाठी १० लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर

सिंधुदुर्गनगरी :
सिंधू बँक स्टाफ सोसायटीची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेच्या प्रत्येक सभासदासाठी स्टाफ सोसायटीमार्फत १० लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयाबद्दल उपस्थित सभासदांनी संचालक मंडळाचे विशेष अभिनंदन केले.
सभेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, स्टाफ सोसायटीचे अध्यक्ष निलेश कनयाळकर, उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर, सचिव सुनील फणसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, कार्यलक्षी संचालक दिवाकर देसाई, कर्मचारी प्रतिनिधी देवेंद्र धुरी, युनियन सेक्रेटरी दिगंबर गवाणकर यांच्यासह संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्टाफ सोसायटीच्या आर्थिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बँक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी संस्थेच्या धोरणात्मक बदलांसाठी आपले पूर्ण मार्गदर्शन राहील, असे आश्वासन देत संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले.

संस्था अध्यक्ष निलेश कनयाळकर यांनी संस्थेचा कारभार पारदर्शकपणे चालविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडत आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर केला.
यावेळी सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्टाफ सोसायटीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सभासदांची लक्षणीय उपस्थिती हे सभेचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

यावेळी व्यासपीठावर संचालक पूर्णानंद सरमळकर, राजेंद्र गावकर, रोहन म्हापसेकर, जयेश सावंत, बाबुराव ठाकूर, संतोष कोणकर, श्यामसुंदर गवस, सतीश आटक, उल्हास रनशूर, पद्माकर ठाकूर, विश्वनाथ डोर्लेकर, युगा पेडणेकर, अनिता राठोड, कर्मचारी सौ. खोत, सौ. बंगे, रमेश परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सुनील फणसेकर यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर यांनी केले, तर आभार संचालक लक्ष्मण लिंगायत यांनी मानले.