पत्रकार मित्रांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती : शिवसेनेतर्फे पार्थिवावर भगवी शाल अर्पण
सावंतवाडी : ज्येष्ठ पत्रकार तथा शिवसेनेचे माजी सावंतवाडी तालुकाप्रमुख उत्तम वाडकर यांचे रविवारी सायंकाळी कोल्हापूर येथे निधन झाले होते. आज त्यांचे पार्थिव सावंतवाडीतील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थीवावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार, जुने शिवसैनिक तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उत्तम वाडकर हे एक निष्ठावान शिवसैनिक असल्याने त्यांच्या पार्थिवावर शिवसेनेच्यावतीने भगवी शाल अर्पण करण्यात आली यावेळी अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
उत्तम वाडकर हे गेल्या काहि दिवसांपासून आजारी होते. कोल्हापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यातच उपचारादरम्यान रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले होते. वाडकर याच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरताच त्यांच्या काळातील अनेक शिवसैनिक त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी वाडकर यांना श्रध्दांजली अर्पण केली. अखेर अंत्यविधीवेळी सावंतवाडीतील ज्येष्ठ शिवसैनिक संदिप टोपले यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी भगवी शाल त्याच्या पार्थिवावर अर्पण केली.
उत्तम वाडकर हे तत्कालीन सावंतवाडी दोडामार्ग अखंड तालुक्याचे तालुकाप्रमुख होते. त्यावेळी त्यांनी या भागात संघटना वाढीसाठी मोठी मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांच्या काळातील बहुतांशी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. त्यांनी साश्रू नयनांनी वाडकर यांना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, ॲड.बापू गव्हाणकर, नगरपरिषद सभापती आनंद नेवगी, उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, ज्येष्ठ शिवसैनिक भाई देऊलकर, विनोद काजरेकर, चंद्रकांत कासार, आबा केरकर, विलास सावंत सुधीर पराडकर, अशोक धुरी, संदिप राणे, आजो मांजरेकर यांच्यासह संतोष गांवस, सुरेश भोगटे, दत्ताराम गावकर,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, अनंत जाधव, साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष नितीन तळेकर ,दिव्या वायंगणकर, संजीवनी देसाई ,दिलीप हिदळेकर, मनोज माळकर, हर्षवर्धन धारणकर आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










