उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार : जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

सेवा पंधरवड्यानिमित्त ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार ‘ अभियानाचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मिळणाऱ्या चांगल्या सेवेचे कौतुक करताना, येथील रिक्त पदे भरण्यासाठी आपल्या वरिष्ठ नेत्यांमार्फत कायम पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज दिले.   

सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार ‘ अभियानांतर्गत महिला तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले, माजी सभापती अशोक दळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता कविटकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, माजी नगरसेवक गुरु मठकर, अनारोजीन लोबो ,

 

 

दिपाली सावंत, दिपाली भालेकर, उमाकांत वारंग, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, संजय माजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, दिलीप भालेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मनीष दळवी पुढे म्हणाले, “या रुग्णालयात असलेली गर्दी पाहता, येथे चांगले काम चालले आहे हे स्पष्ट होते आणि याचे श्रेय २४ तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांना जाते. भविष्यातही अशाच प्रकारे रुग्णांना सेवा मिळावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या गरजेवर भर दिला, मात्र त्यासोबतच सध्या सेवा देत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी सावंतवाडीकरांनी पुढाकार घेण्याची मागणी केली. रिक्त पदे भरण्यासाठी राजकीय मंडळींनी जनरेटा लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी रुग्णालयाच्या सकारात्मक कामाचे कौतुक केले आणि रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांचे कायम प्रयत्न असल्याचे सांगितले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनीही सावंतवाडी रुग्णालयातील सेवेची प्रशंसा केली आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून रक्ताचे नाते जपत रक्तदानाचे अतुलनीय कार्य करणारे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्यासह आरोग्य सेवेसाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. या शिबिराचा अनेक रुग्णांनी तसेच महिलांनी लाभ घेतला.