माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे मोफत गणवेश व दप्तर वितरण कार्यक्रम

तेजस गावकर यांच्या सामाजिक दातृत्वातून सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व दप्तर वाटप

शिरगाव (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे, या उद्देशाने माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे मोफत गणवेश व दप्तर वितरण समारंभ उत्साहात पार पडला. साळशी येथील शिक्षणप्रेमी श्री. तेजस आनंद गावकर यांच्या सामाजिक दातृत्वातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व दप्तरांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. सत्यवान भोगले होते. संस्था अध्यक्ष श्री. सत्यवान सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सत्यवान भोगले यांनी श्री. तेजस आनंद गावकर यांच्या सामाजिक दातृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, “शिक्षणाच्या प्रवासात समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. आज मिळालेल्या या मदतीचे मोल ओळखून विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन करावे. भविष्यात सक्षम झाल्यानंतर आपणही समाजासाठी योगदान देत समाजाचे देणे फेडण्याची भावना जपावी.”

कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा श्रीमती श्रेया धुळप, मुख्याध्यापक श्री. संजय मराठे, ज्येष्ठ शिक्षक श्री. पुरुषोत्तम साटम, शिक्षक श्री. स्वप्निल भरणकर, श्री. सदाशिव भिसे तसेच शिक्षक, संस्थाचालक, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. पुरुषोत्तम साटम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. संजय मराठे यांनी केले. श्री. तेजस आनंद गावकर यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, स्कूल कमिटी तसेच साळशी ग्रामविकास मंडळाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.