भरवस्तीत बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांत भितीचे वातावरण
शिरगाव, (प्रतिनिधी) :
देवगड तालुक्यातील तोरसोळे-राणेवाडी येथील शेतकरी अशोक अनंत सावंत यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घुसून एक वर्षांच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेमुळे सावंत यांचे आर्थिक नुकसान झाले असून भरवस्तीत बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून एक वर्षांच्या वासराच्या मानेवर झडप घालत त्याला ठार केले. हल्ल्यानंतर गोठ्यातील इतर जनावरे घाबरून हंबरडा फोडू लागली, तर कुत्रेही मोठ्याने भुंकू लागले. या आवाजाने अशोक सावंत व त्यांच्या कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी तातडीने गोठ्याकडे धाव घेतली असता वासरू मृतावस्थेत पडलेले आढळले. दरम्यान, बिबट्याने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
भरवस्तीजवळ बिबट्याचा वाढता वावर पाहता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक उमेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यात श्री. सावंत यांचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.
तरी वनविभागाने तातडीनेया परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांतून मागणी होतं आहे.













