सुदैवाने मोठा अनर्थ टळला : गाडीतून प्रवास करत होते ४५ प्रवासी
वेंगुर्ले : दाजी नाईक
गोवा पणजी येथून संध्याकाळी ४.३० वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची कदंबा बस शिरोडा च्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळा जवळ वळणावर दुचाकीला वाचविण्याच्या नादात गटारात कलंडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. बस मधून ४५ प्रवासी प्रवास करत होते. सदर घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
गोवा येथून कदंबा गाडी क्रमांक जी ए ०३ एक्स ०२४९ घेऊन चालक सायंकाळी शिरोडा मार्गे वेंगुर्ले येण्यासाठी निघाले. आजगाव येथे ही बस आली असता समोरून मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या वळणावर दुचाकी वाहन चालकाने चार चाकी गाडीला ओव्हरटेक करत असताना त्या दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात सदर बस खोलदरीच्या काही फूट अंतरावर गटारात कलंडली. सदर बस मध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते. सदर प्रवाशांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. बस वाघबिळाजवळ वळणावर कलंडली असतानाचे वृत्त समजतात परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेऊन प्रवाशांना वाचविले. या प्रवाशांपैकी सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही परंतु काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता परंतु सदर बसच्या चालकाच्या प्रसंगवदाने मोठा अनर्थ टळला.












