साईबाबांच्या आशीर्वादाने प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्याचा ध्यास; आ. दीपक केसरकर

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला केसरकरांच्या निवासस्थानी साई पालखीचे आगमन व पूजन 

 

उद्या आमदार केसरकर होणार पालखीचे भोई

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : 

​गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर सावंतवाडी येथील माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी प्रतिशिर्डी येथून आलेल्या श्री साईबाबांच्या पालखीचे मंगलमय वातावरणात आगमन झाले. या पावन प्रसंगी आमदार दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते श्री साईबाबांच्या पवित्र पादुकांचे भावपूर्ण पूजन करण्यात आले. साईचरणी नतमस्तक होत असताना कार्यकर्त्यांनी श्री. केसरकर यांना पुन्हा एकदा मंत्रीपद लाभावे, असे साकडे (गाऱ्हाणे) साईबाबांच्या चरणी घातले.

​आपले मनोगत व्यक्त करताना आमदार दीपक केसरकर यांनी अध्यात्म आणि लोकसेवेचा सुंदर मिलाफ साधत सांगितले की, साईबाबांनी न मागता सर्व काही दिले आहे. चार वेळा आमदार होण्याचे आणि मंत्री म्हणून सेवा करण्याचे भाग्य मिळाले, तसेच लोकांचे अथांग प्रेम कमावले हीच खरी पुंजी आहे. आता साईबाबांच्या कृपेने जनतेच्या सेवेसाठी हाती घेतलेले प्रलंबित प्रकल्प पूर्णत्वास नेण्यावरच आपला मुख्य भर आहे. सावंतवाडीच्या विकासाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे शपथपत्र गुरुवारी सादर होणार असून भोगले घराण्याशी आजच्याच पावन दिवशी यावर सकारात्मक चर्चा झाली आहे, ज्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.

याशिवाय सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाने विभागात दुसरा क्रमांक पटकावला असून भविष्यात हे रुग्णालय २०० खाटांचे एक सर्वोत्कृष्ट रुग्णालय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या मंत्रीपदाच्या इच्छेबाबत बोलताना, पक्षाचे नेते एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

​आपल्या आध्यात्मिक आणि वैचारिक प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले की, गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रेरणा घेत हिंदुत्वाच्या गुरूंना नमन करण्याचा हा संकल्प आहे. राजकारणात विचारधारेला अनन्यसाधारण महत्त्व असून बाळासाहेब ठाकरे यांनी ही विचारधारा भारताला दिली, ज्यामुळे आज एका बलाढ्य राष्ट्राच्या रूपात भारताची ओळख निर्माण झाली आहे.

या मंगल प्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ज्येष्ठ नेते अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सुधा कवठणकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.