चार मुली, एक स्वप्न… कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनने १०,५०० वह्यांतून लिहिला माणुसकीचा धडा.”

कोल्हापुर l प्रतिनिधी*

*प्रतापसिंह काळे*

 

 

समाज बदलायचा असेल तर मोठमोठ्या घोषणा करण्याची गरज नसते; एका मुलाच्या हातात वही ठेवण्याइतकी साधी कृतीही परिवर्तनाची सुरुवात करू शकते. कारण रिकाम्या हातात वही आली की त्या हातात उद्याचे भविष्य लिहिण्याची ताकद निर्माण होते. कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनने १०,५०० वह्यांचे वाटप करून केवळ शैक्षणिक साहित्य दिले नाही, तर शिक्षणाच्या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी उभारी दिली आहे.

 

६ जून २०२६ रोजी १० हजार फॉलोअर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुरू झालेला हा उपक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वास गेला. या कालावधीत जिल्ह्यातील १३ हून अधिक शाळांमध्ये आणि दुर्गम वस्त्यांवर जाऊन १,६०० हून अधिक विद्यार्थ्यांना १०,५०० पेक्षा अधिक वह्यांचे वाटप करण्यात आले. गडहिंग्लज, टोप-हातकणंगले, शाहूवाडी, करुंगळे, मनवद, कुशिरे-पन्हाळा, बोरगाव, नरंदे, बिद्री आणि कोल्हापूरसह अनेक दुर्गम भागांत ही मदत पोहोचली.

 

या उपक्रमाची खरी ताकद म्हणजे चार तरुणींचे नेतृत्व. श्रुती चौगुले, अर्पिता राऊत, श्रेया चौगुले आणि आंचल काट्यारे या चार बालमैत्रिणींनी स्वतः गावोगावी प्रवास करून विद्यार्थ्यांच्या हातात वह्या दिल्या. आज समाजात नेतृत्वाबद्दल अनेक चर्चा होतात; पण या चार मुलींनी नेतृत्वाची व्याख्या कृतीतून दाखवून दिली. समाजासाठी काम करण्यासाठी पदाची गरज नसते, तर मनात संवेदना असावी लागते, हे त्यांनी सिद्ध केले.फाउंडेशनचे प्रमोद चौगुले यांचे या उपक्रमाला महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. विविध देणगीदार, फॉलोअर्स आणि हितचिंतकांच्या मदतीमुळे हा उपक्रम शक्य झाला. एसएस कम्युनिकेशन्स यांनी १०० डझन म्हणजेच १,२०० वह्यांची देणगी देऊन सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली. अनेक शिक्षकांनी गरजू विद्यार्थ्यांची माहिती देत हा उपक्रम योग्य ठिकाणी पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.वह्यांचे वाटप होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि शिक्षकांच्या डोळ्यांत दिसलेले समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे होते. “चार मुली एवढे मोठे सामाजिक काम करत आहेत, ही प्रेरणादायी बाब आहे,” अशा भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केल्या.

 

मे २०२१ मध्ये कोविड काळात गरजूंना नाश्ता वाटपापासून सुरू झालेला कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनचा प्रवास आज शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रस्ता सुरक्षा आणि विविध सामाजिक उपक्रमांपर्यंत विस्तारला आहे. “We Share Because We Care” ही त्यांची केवळ घोषणा नाही; ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसणारी जीवनमूल्ये आहेत.

आज शिक्षण महाग होत चालले आहे, अनेक पालकांना मुलांसाठी वही-पुस्तके घेणेही कठीण होत आहे. अशा वेळी एका वहीचे मूल्य केवळ काही रुपयांत मोजता येत नाही; ती एका विद्यार्थ्याचा आत्मविश्वास असते, एका कुटुंबाची आशा असते आणि समाजाच्या भविष्यातील गुंतवणूक असते.

 

१०,५०० वह्यांचे वाटप हा फक्त एक सामाजिक उपक्रम नाही. तो समाजातील माणुसकी अजून जिवंत असल्याचा पुरावा आहे. कारण शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या हातात वही असेल, तर त्या वहीतून उद्याचा सुशिक्षित, संवेदनशील आणि जबाबदार समाज घडण्याची शक्यता अधिक बळकट होते. अशा उपक्रमांचे खरे यश आकड्यांत नसते; ते विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पेटलेल्या स्वप्नांत असते.