वेंगुर्ला मिडटाऊन रोटरीकडून होतकरू मुलींना मोफत सायकल वाटप..

शिक्षणासाठी वाहतुकीची अडचण दूर करण्याचा उपक्रम..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील गरजू व होतकरू ५ मुलींना शिक्षणासाठी मदत म्हणून मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

शाळेत येण्या-जाण्यासाठी मुलींना होणारा त्रास लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे मुलींच्या शिक्षणातील एक महत्त्वाची अडचण दूर होऊन त्यांना नियमित शाळेत जाता येणार आहे. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष रोटेरियन ॲड. प्रथमेश नाईक, माजी अध्यक्ष आनंद बोवलेकर, माजी अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, माजी अध्यक्ष योगेश नाईक तसेच रोटरी सदस्य दादा साळगावकर आदी उपस्थित होते.

सायकल लाभलेल्या विद्यार्थिनी मध्ये सिद्धी ठाकूर : मठ हायस्कूल, देऊ धुरी : वेंगुर्ला हायस्कूल, दिव्या पेडणेकर : उभादांडा हायस्कूल, दिव्यांका गावडे : शिरोडा हायस्कूल आणि अनवी दाभोलकर : दाभोली हायस्कूल यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष प्रथमेश नाईक म्हणाले की, “मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. छोट्या-छोट्या मदतीतून मोठे बदल घडतात. या सायकलींमुळे मुलींचा वेळ वाचेल आणि त्या अभ्यासावर अधिक लक्ष देऊ शकतील.” या उपक्रमाबद्दल लाभार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी रोटरी क्लबचे आभार मानले.