युवकांच्या लेखणीतून घडेल नवा महाराष्ट्र; ‘लेखन प्रेरणा दिन’ला शासनमान्यता!”

कोल्हापूर (प्रतिनिधी)

 प्रतापसिंह काळे:

एखाद्या विचाराचा प्रवास हा रस्त्यावरच्या घोषणांनी पूर्ण होत नाही; तो समाजाच्या विवेकापर्यंत पोहोचला, की इतिहास घडतो. साहित्यरत्न लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १ ऑगस्ट या जन्मदिनाला महाराष्ट्र शासनाने “लेखन प्रेरणा दिन” म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि एका वैचारिक चळवळीला शासनमान्यता मिळाली. या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज शिवाजी विद्यापीठ परिसरात पेढे वाटून उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र शासन, शिवाजी विद्यापीठ प्रशासन आणि या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.या प्रसंगी दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, डॉ. डी. वाय. जमादार, डॉ. कपिल राजहंस, सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी मदन पवार, महाग्रंथाच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके, अनिल म्हमाने, अंतिमा कोल्हापूरकर, डॉ. वसंत भागवत तसेच बहुसंख्य विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

 

मदन पवार यांनी सांगितले की, जुलै २०२४ पासून राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सांगली व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित शासकीय कार्यालयांकडे सातत्याने निवेदने, ई-मेल आणि लेखी पत्रव्यवहार करून “१ ऑगस्ट लेखन प्रेरणा दिन” घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर इतक्या अल्पावधीत शासनाने हा निर्णय जाहीर केल्याने हा केवळ आनंदाचा नव्हे, तर वैचारिक संघर्षाला मिळालेला सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.दंगलकार कवी नितीन चंदनशिवे म्हणाले, “अण्णा भाऊ साठे यांना केवळ लोकशाहीर म्हणून स्मरण करून चालणार नाही. त्यांच्या लेखणीतून माणसाचा इतिहास, वेदना आणि संघर्ष बोलतो. ‘लेखन प्रेरणा दिन’ ही संकल्पना नव्या पिढीला लिहिण्याची, वाचण्याची आणि समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची प्रेरणा देणारी ठरेल. शासनाचा हा निर्णय भविष्यातील संवेदनशील समाज घडविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.”उपस्थितांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला आणि हा निर्णय अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक वारशाला मिळालेला योग्य मान असल्याचे सांगितले.

 

एखादी संकल्पना शासनाच्या दालनापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्य, संयम आणि विचारांवरील निष्ठा लागते. आज “लेखन प्रेरणा दिन” ही संकल्पना शासनमान्य झाली आहे. हा केवळ एका मागणीचा विजय नाही; हा लेखणीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संवेदनशील माणसाचा विजय आहे. शब्दांची ताकद समाज बदलू शकते, यावर शिक्कामोर्तब करणारा हा क्षण आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना शैक्षणिक मुख्य प्रवाहात मानाचे स्थान देणारा हा निर्णय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून स्मरणात राहील.

 

 

शिवाजी विद्यापीठ परिसरात “लेखन प्रेरणा दिन” शासनमान्य झाल्याबद्दल पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करताना दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, डॉ. डी. वाय. जमादार, डॉ. कपिल राजहंस, सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी मदन पवार, डॉ. शोभा चाळके, अनिल म्हमाने, अंतिमा कोल्हापूरकर, डॉ. वसंत भागवत तसेच विद्यार्थी आणि मान्यवर.