सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासाचा रथ पुढे नेणारा आ. शेखर निकम उत्तम काम करतोय- ना. चंद्रकांत बावनकुळे

मतदारसंघातील महसूल संदर्भातील कामे मार्गी लावणार
पेढे व नवीन कोळकेवाडीच्या प्रश्नांवरही सकारात्मक निर्णय

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी दौऱ्यादरम्यान राज्याचे महसूल मंत्री यांनी सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे तसेच आमदार शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देत आ. निकम यांच्या विकासाभिमुख कार्याचे जाहीरपणे कौतुक केले. “शेखर निकम उत्तम काम करतोय. मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” या शब्दांत त्यांनी निकम यांच्यावरील विश्वास व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

यावेळी मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील महसूल संदर्भातील कामे मार्गी लावणार, शासनाच्या पातळीवर प्रलंबित राहणार नाही. शेखर निकम यांनी मांडलेले प्रत्येक रास्त प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील. पेढे गाव आणि नवीन कोळकेवाडी येथील प्रलंबित प्रश्नही शासन सकारात्मकपणे सोडवेल.” महायुतीच्या एकजुटीवर भर देताना त्यांनी “महायुतीमध्ये उत्कृष्ट समन्वय राखणारा, सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासाचा रथ पुढे नेणारा आमदार म्हणजे शेखर निकम. महायुतीचे काम अधिक ताकदीने करा; राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे गौरवोद्गार काढले.

या भेटीदरम्यान विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, प्रशांत यादव आदी पदाधिकारी त्यांच्या सोबत होते भेटीदरम्यान मंत्री बावनकुळे यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. कृषी महाविद्यालय, फूड टेक्नॉलॉजी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संस्था करत असलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी आमदार शेखर निकम यांनी मंत्री बावनकुळे यांचे स्वागत केले. संस्था कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, जि.प. सदस्या पूजा निकम, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आ. शेखर निकम यांच्या कामाचे केलेले भरभरून कौतुक, विकासकामांबाबत दिलेली ठाम ग्वाही आणि महायुतीतील त्यांच्या समन्वयक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेला विश्वास हा या भेटीचा केंद्रबिंदू ठरला.