लोरे नं. १ ग्रामपंचायतीतर्फे महिलांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर संपन्न
सहभागी महिलांना मोफत पक्षी वाटपाची घोषणा
कणकवली :
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने लोरे नंबर १ ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगांतर्गत ‘महिला कुक्कुटपालन मार्गदर्शन शिबिरा’चे आयोजन लोरे शाळा नंबर १ येथे करण्यात आले होते. कुक्कुटपालन हा केवळ जोडधंदा नसून आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि शासकीय योजनांची जोड दिल्यास तो एक अत्यंत फायदेशीर उद्योग ठरू शकतो, असे प्रतिपादन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. तुषार वेर्लेकर यांनी केले.
या शिबिरात उपस्थित महिलांना व्यवसायाची सुरुवात, कोंबड्यांच्या प्रजातींची निवड, खाद्य व स्वच्छता व्यवस्थापन, वेळोवेळी लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाय तसेच उत्पादनाचे विपणन (मार्केटिंग) याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती देण्यात आली. कमी गुंतवणुकीत वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केल्यास नियमित आणि चांगले उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे डॉ. वेर्लेकर यांनी स्पष्ट केले.
ऑक्टोबरमध्ये मोफत पक्षी वाटप: सरपंच अजय रावराणे
कार्यक्रमप्रसंगी बोलताना सरपंच अजय रावराणे यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. घरच्या घरी सुरू करता येणारा हा व्यवसाय महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रभावी माध्यम आहे. बचत गट किंवा समूहाच्या माध्यमातून उत्पादन केल्यास बाजारपेठ मिळवणे अधिक सोपे होते, असे ते म्हणाले. तसेच, प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या प्रत्येक महिलेला येत्या ऑक्टोबर महिन्यात १ महिना वाढ झालेली कोंबडी ग्रामपंचायतीतर्फे मोफत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिरात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शंका व प्रश्नांचे तज्ज्ञांकडून निरसन करून घेतले. प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून काहींनी तात्काळ हा व्यवसाय सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
या कार्यक्रमास उपसरपंच रसिका राणे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश गोवळकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कलढोने, ग्रामपंचायत सदस्या सुमन गुरव, महिला बचत गटांच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









