कळसुलीची शेती समृद्ध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले

कृषी पदवीधर, अधिकारी आणि शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक

शेतीपूरक व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेवर भर

कणकवली : गावातील शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कृषी पदवीधर, शासकीय अधिकारी आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असा सूर कळसुली ग्रामपंचायत हॉलमध्ये झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत उमटला. शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीत गावाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कळसुली गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील कृषी पदवीधर, शासकीय अधिकारी आणि शेतकरी यांनी पुढाकार घेत या बैठकीचे आयोजन केले होते. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ विजय दिनकर दळवी यांनी प्रास्ताविक करत उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत केले.

यावेळी अधिष्ठाता उद्यानविद्या, मुळदेचे डॉ. विजय विष्णू दळवी यांनी कळसुली गावाशी असलेले आपले नाते सांगत शेती विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. मी या गावात लहानाचा मोठा झालो, शिकलो. या गावाचे मी देणे लागतो, अशी भावना व्यक्त करत त्यांनी कृषी विकासासाठी १० ते २० शेतकऱ्यांचे गट तयार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शेतीमध्ये मोठा वाव असून गावाचा कृषी विकास झाला तर रोजगारासाठी गावाबाहेर जाणाऱ्या युवकांना गावातच चांगले अर्थार्जनाचे साधन उपलब्ध होऊ शकते. गोवा मार्केट जवळ असल्याने शेतमालाला बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करता येतील, असे त्यांनी सांगितले.

आपण विकसित केलेल्या भाताच्या जाती कळसुलीतील शेतकरी वापरत असल्याचे पाहून समाधान वाटते, असेही डॉ. दळवी यांनी नमूद केले. गावची जुनी संस्कृती आणि आपुलकी जपत शेतकरी टिकणे आवश्यक असून नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टीने शेतीकडे पाहिल्यास गावाचा विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ विजय दिनकर दळवी यांनी शेती विकासातील तांत्रिक अडचणींवर चर्चा करत त्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर शेतीचा विकास साधता येईल. गावची जुनी संस्कृती आणि आपुलकी टिकवून शेतकरी जगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवीण राऊत यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करत आधुनिक अवजारांचा वापर करून शेती करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी शेतकऱ्यांनी प्रथम कृषीविषयक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. फळपिकांवर प्रक्रिया करणारे केंद्र सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवून त्यावर प्रक्रिया केल्यास अधिक नफा मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. परसातील कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन तसेच जीवामृत निर्मितीचे प्रशिक्षण उपलब्ध असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा मृदा संधारण अधिकारी श्रीम. मुळे यांनी मातीचे आरोग्य जपण्यासाठी प्रथम माती परीक्षण करण्याचे आवाहन केले. माती परीक्षण केवळ ३५ रुपयांत उपलब्ध असल्याचे सांगत जीवामृत व दशपर्णी अर्काचा वापर वाढवावा आणि रासायनिक खतांचा वापर कमी करावा, असा सल्ला त्यांनी दिला. संबंधित केंद्राला भेट देऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे यांनी संपूर्ण पंचक्रोशीचे प्रतिनिधी म्हणून शेती विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रासायनिक घटकांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.

डॉ. साक्षी सावंत यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश दळवी यांनी गावातील विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचले असून ते आता गावाच्या विकासासाठी योगदान देत आहेत, याबद्दल आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांनी घाईगडबड न करता कृषी पदवीधरांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच प्रगतिशील शेतकरी उत्तम वारंग यांच्यासारख्या शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

डॉ. एस. एस. दळवी यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या फायद्याची माहिती दिली. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत गावातील कृषी पदवीधरांनी एकत्र येऊन १० ते २० जणांचे गट स्थापन करणे, गावाच्या विकासात सक्रिय योगदान देणे, पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, कुंपणाशिवाय शेतीचा प्रयोग करणे, सहकारी सोसायट्यांचे आधुनिकीकरण करणे, शेतकरी पुस्तकालय सुरू करणे, शेतमालासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, दूध व्यवसायाचा विस्तार करणे आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे, असे विविध मुद्दे निश्चित करण्यात आले. या बैठकीमुळे कळसुलीतील शेतकऱ्यांमध्ये कृषी विकासाची नवी आशा निर्माण झाली असून ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास कळसुली गाव शेतीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर व समृद्ध होऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस विजय दिनकर दळवी, अधिष्ठाता उद्यानविद्या मुळदेचे डॉ. विजय दळवी, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे, जिल्हा मृदा संधारण अधिकारी श्रीम. मुळे, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश दळवी, सरपंच सचिन पारधिये, प्रवीण राऊत, डॉ. साक्षी सावंत, डॉ. एस. एस. दळवी, कृषी अधिकारी श्रीम. शेटे, श्रीम. निरवडेकर, श्रीम. जाधव, उत्तम वारंग, नि. स. वि. अधिकारी रामचंद्र जंगले, नि. पो. बापू खरात, श्री सावंत, बाळा कदम यांच्यासह सुमारे ४० ते ४५ शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.