मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेऊन मच्छीमारांनी आर्थिक उन्नती साधावी : सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर

वेंगुर्ले येथे मत्स्यव्यवसाय विभागाकडून जनजागृती कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ले : दाजी नाईक
मच्छीमार बांधवांच्या हितासाठी शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे. या योजनेची जनजागृती मच्छीमार बांधव, मच्छीमार सहकारी संस्था पदाधिकारी यांनी करावी. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मच्छीमार बांधवांनी घेऊन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग चे सहाय्यक आयुक्त श्री.सागर कुवेसकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छिमार बांधवासाठी विविध प्रकारच्या लाभदायी योजना राबविल्या जातात. त्यासाठी विभागामार्फत वेळोवेळी सुचना दिल्या जातात. विभागामार्फत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी अधिकारी वर्ग व सागरमित्र हे आपल्या आपल्या स्तरावरून अंमलबजावणी करीत असतात. याच पार्श्वभूमीवर आज १३ ऑगस्ट रोजी नगर वाचनालय सभागृह, वेंगुर्ला येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत उपस्थित मच्छिमारांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय विविध योजनांची माहिती श्रीमती भक्ती पेजे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, श्रीमती उत्कर्षा कीर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, श्री.गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी, वेंगुर्ला यांनी देऊन मार्गदर्शन केले. यावेळी पारंपरिक रापण संघाचे अध्यक्ष दादा केळुसकर, मच्छीमार नेते वसंत तांडेल व अन्य मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात सद्यस्थितीत विभागामार्फत ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेची जनजागृती करण्यास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.नितेश राणे यांचेमार्फत आदेशित करण्यात आलेले होते, त्यास अनुसरून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची जनजागृती, योजनेचे मार्गदर्शक पुस्तक अनावरण, नौका मालकांना TED उपकरणाचे महत्त्व अधोरेखित करून TED उपकरणाचे वाटप करण्यात आले. तसेच विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती जसे की GAIS, NFDP नोंदणी, KCC योजना याबाबत उपस्थित मच्छीमारांना माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमात वेंगुर्ला तालुक्यातील मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सदर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.