माजगाव येथे स्वातंत्र्यदिनी शहीद नौसैनिक शुभम सावंत यांच्या पुतळ्याचे अनावरण
वीर माता-पित्यांचा सन्मान : इतर वीरपत्नी व मातापित्यांचाही विशेष गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी :
माणसाचे जीवन आणि मृत्यू हे त्याच्या हातात नसले तरी देशासाठी वीरत्व प्राप्त होणे ही नितांत अभिमानाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे; त्यामुळे तरुण पिढीने भयमुक्त व धीरोदात्तपणे जगून राष्ट्रकार्यासाठी स्वतःला समर्पित करावे, असे प्रतिपादन कारगिल युद्धातील अनुभवी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा यांनी केले. माजगाव येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहीद नौसैनिक शुभम उदय सावंत यांच्या पुतळ्याचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
८० वर्षांपूर्वी मिळालेल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आजच्या नव्या पिढीने समजून घेणे काळाची गरज असल्याचे सांगत डॉ. सिन्हा म्हणाले की, १२ ऑक्टोबर २०१४ रोजी मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण आलेल्या शहीद शुभम सावंत यांचा त्याग हा संपूर्ण राष्ट्राचा गौरव आहे. त्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या हुतात्म्यातून प्रेरणा घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त माजगाव ग्रामपंचायतीच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सोहळ्यात वीर माता-पिता आणि वीरपत्नीचा मान्यवरांच्या हस्ते भावूक वातावरणात गौरव करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये यशस्वी नेतृत्व केलेले निवृत्त सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करणाऱ्यांची संख्या विरळ असली, तरी असा त्याग येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक आणि आदर्श ठरतो, असे त्यांनी नमूद केले.
हा सोहळा माजगावच्या ग्रामस्थ आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणणारा ठरला. कार्यक्रमास माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रंजना कानसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, संजय कानसे यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद शुभम सावंत यांच्या पुतळ्याच्या रूपाने माजगावच्या मातीत देशप्रेमाचे एक अजरामर प्रतीक निर्माण झाले असून, हा सोहळा उपस्थितांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून गेला.











