भारतीय लष्करासाठी बीपीसीएलकडून विशेष हवामानासाठी उपयुक्त डिझेलची निर्मिती

बिनास्थित रिफायनरीतून पहिल्या XWG डिझेल रेकला हिरवा झेंडा

: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) राष्ट्रीय सेवेसाठीची बांधिलकी आणि तंत्रज्ञानातील प्रगती अधोरेखित करत १७ ऑगस्ट २०२६ रोजी बिनास्थित रिफायनरीमधून पहिल्या ‘एक्स्ट्रीम वेदर ग्रेड’ (XWG) डिझेल रेकला हिरवा झेंडा दाखवला आहे.

भारतीय लष्कराच्या IHQ of MoD (Army) अंतर्गत DGST लेफ्टनंट जनरल मुकेश चढ्ढा, AVSM, SM, VSM यांच्या हस्ते या XWG डिझेल रेकला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी बीपीसीएलचे संचालक (मार्केटिंग) श्री. शुभंकर सेन तसेच भारतीय लष्कर, भारतीय रेल्वे आणि बीपीसीएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अतिथंड हवामान आणि उंचावरील प्रदेशात लष्करी वाहने चालविताना भारतीय लष्करासमोर येणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करून बीपीसीएलने हे XWG डिझेल स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केले आहे. बीपीसीएलच्या कॉर्पोरेट रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर (सीआरडीसी) आणि बिना रिफायनरीने एकत्रितपणे संशोधन, नव्या कल्पना आणि तांत्रिक प्रगतीच्या माध्यमातून हे ‘एक्स्ट्रीम वेदर ग्रेड’ डिझेल विकसित केले आहे.

XWG डिझेलमध्ये अतिशय कमी गोठणबिंदू, कमी कोल्ड फिल्टर प्लगिंग पॉइंट (CFPP), अत्यंत थंड वातावरणात सहज इंजिन सुरू होण्याची क्षमता, वाहनांची कार्यक्षमता सुधारण्याची क्षमता, क्षेत्रीय देखभालीची आवश्यकता कमी करण्याबरोबरच प्रतिकूल हवामानात अधिक विश्वासार्ह कार्यक्षमता यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

यावेळी बीसीएलने नमूद केले की, XWG डिझेलची यशस्वी निर्मिती आणि पहिल्या रेकची वाहतूक ही संस्थेची नव संशोधन, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेली बांधिलकी दर्शविणारी महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. उच्च उंचीवरील भागांमध्ये लष्करी रसद आणि मोहिमांसाठी इंधनाची विश्वासार्हता वाढविण्यात या उत्पादनाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यामुळे कार्यक्षमता आणि मोहिमेसाठीची सज्जता अधिक बळकट होण्यास मदत होईल.

बीपीसीएलचे संचालक (मार्केटिंग) श्री. शुभंकर सेन म्हणाले, “XWG डिझेलची निर्मिती आणि पहिल्या रेकची वाहतूक ही BPCLच्या संशोधन, तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.” ते पुढे म्हणाले, “देशाच्या धोरणात्मक गरजांनुसार नाविन्यपूर्ण ऊर्जा उपाय उपलब्ध करून देण्यासाठी बीपीसीएल कटिबद्ध आहे.”

बीपीसीएल बिना रिफायनरीचे कार्यकारी संचालक श्री. के. के. दास म्हणाले, “पहिल्या XWG डिझेल रेकला हिरवा झेंडा दाखविणे हा बिना रिफायनरीसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. बीपीसीएलच्या संशोधन, रिफायनिंग, मार्केटिंग आणि लॉजिस्टिक्स विभागांमधील उत्कृष्ट समन्वय व सांघिक प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.” राष्ट्रीय हित लक्षात घेऊन विशेष प्रकारची उच्च दर्जाची उत्पादने विकसित करण्याचे काम यापुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बीपीसीएलचे बिझनेस हेड (इंडस्ट्रियल अँड कमर्शियल सोल्युशन्स) श्री. मनोज मेनन म्हणाले, “देशाच्या धोरणात्मक क्षेत्रांसाठी विशेष ऊर्जा उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी बीपीसीएल सातत्याने कार्यरत आहे. भारतीय सशस्त्र दलांना नियमित आणि विश्वासार्ह इंधनपुरवठा करणे हे बीपीसीएलचे महत्त्वाचे प्राधान्य आहे.”

बिना रिफायनरीमधून XWG डिझेलची करण्यात आलेली ही पहिली वाहतूक भारतीय सशस्त्र दलांसाठी विश्वासार्ह ऊर्जा भागीदार म्हणून बीपीसीएलची भूमिका अधिक दृढ करणारी आहे. भारताच्या धोरणात्मक गरजांनुसार विशेष प्रकारचे इंधन विकसित करण्याची बीपीसीएलची क्षमता यामुळे अधोरेखित झाली आहे.