राकेश लाड जपतायत अस्सल गावरान भाषेची झलक
देवरूख (प्रतिनिधी):
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील सनराईज हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करताना ग्राहकांना सेवा देणं हे त्यांचं रोजचं काम; मात्र त्याचबरोबर आपल्या खास गावरान अंदाजात ग्राहकांचं मनोरंजन करणं, ही राकेश लाड यांची वेगळीच ओळख बनली आहे.
ग्राहक टेबलवर बसले की आपुलकीने चौकशी, मिश्कील संवाद आणि अस्सल गावरान भाषेतील भन्नाट किस्से सांगत राकेश वातावरणात हास्याची रंगत आणतात. त्यांच्या बोलण्यातील सहजता, विनोदाची शैली आणि गावाकडच्या मातीतला अस्सल बाज ग्राहकांना चांगलाच भावतो. आजच्या काळात ग्रामीण बोलीभाषा हळूहळू मागे पडत असताना राकेश लाड मात्र आपल्या दैनंदिन कामातूनच ही भाषा जपण्याचं काम करत आहेत. कोणताही दिखावा न करता आपल्या बोलीचा अभिमान बाळगत ते ग्राहकांशी संवाद साधतात. वेटरची नोकरी करत असतानाही आपल्या कलेची आणि गावरान भाषेची साथ न सोडणाऱ्या राकेश लाड यांचा हा अनोखा अंदाज निश्चितच कौतुकास्पद आहे.













