ओटवणे (प्रतिनिधी ) सध्या बदलत्या डिजिटल च्या युगात ग्रामीण व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणून त्यांना या क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी उद्देशाने Excel India Protective Paint, बदलापूर, मुंबई या कंपनीच्या वतीने श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये या शाळेला चार संगणक भेट देण्यात आले. या संगणकांमुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार असून, त्यांच्या डिजिटल ज्ञानाला आणि शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेत उभारण्यात आलेल्या या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन शाळेचे संस्थापक माननीय श्री. एम. डी. सावंत यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.या प्रसंगी सरपंच सौ. रेश्मा सावंत, कमळाकर सावंत, भरत सावंत, चंद्रकांत भिसे, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षण ही विद्यार्थ्यांची अत्यावश्यक गरज बनली आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळणे, डिजिटल साधनांचा शैक्षणिक उपयोग करता येणे आणि भविष्यातील शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने मिळालेले चार संगणक शाळेसाठी अत्यंत मोलाची शैक्षणिक संपत्ती ठरणार आहेत.
Excel India Protective Paint, बदलापूर, मुंबई, ग्रामस्थ श्री. यशवंत सावंत आणि कंपनीच्या मॅनेजर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या या अनमोल भेटीबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या सहकार्यामुळे असनिये परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग अधिक सक्षम झाला आहे.
“ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हातात संगणक, उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानाचे नवे दालन!” या प्रेरणादायी भावनेने संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.हे संगणक शाळेला मिळावे यासाठी ग्रामस्थ यशवंत सावंत तसेच एक्सल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट, बदलापूर, या कंपनीचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.














