माणुसकीचे दर्शन : संस्थेच्या तत्पर आणि निस्वार्थ सेवेचे सर्व स्तरातून कौतुक

सावंतवाडी । प्रतिनिधी :कोणतीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे शहरात एक संजीवनी म्हणून काम करणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काल पुन्हा एकदा आपल्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. संकटात, दुःखात आणि वेदनेत असलेल्या माणसाला मदतीचा हात देऊन त्याला जगवणे हेच प्रमुख ध्येय मानणाऱ्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एका बेवारस तरुणाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढत नवीन जीवन दिले आहे.
विठ्ठल मंदिराच्या समोर एक तरुण दोन्ही हात जमिनीला टेकून घसरत चालला असल्याचे काल काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्या तरुणाच्या दोन्ही पायांना अत्यंत गंभीर व मोठ्या जखमा झाल्या होत्या. त्या जखमांमध्ये किडे पडले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. ही अत्यंत विदारक आणि भीषण परिस्थिती पाहून त्याच्या जवळ जाण्याची वा त्याला मदत करण्याची हिम्मत कोणीही दाखवत नव्हते. अशा वेळी सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांनी तात्काळ पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून या परिस्थितीची माहिती दिली.
घटनास्थळाचे गांभीर्य ओळखून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, शेखर सुभेदार, रूपा मुद्राळे आणि लक्ष्मण कदम यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथे धाव घेतली. त्यांनी संस्थेच्या रुग्णवाहिकेतून त्या तरुणाला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर शेखर सुभेदार आणि रवी जाधव यांनी कोणत्याही घृणेविना त्या तरुणाला स्वतः स्वच्छ आंघोळ घातली. औषधाच्या साह्याने त्याच्या पायातील किडे बाहेर काढून जखमा पूर्णपणे साफ केल्या. त्यानंतर लक्ष्मण कदम यांनी डॉक्टरांच्या मदतीने त्याच्या जखमांना औषध लावून व्यवस्थित ड्रेसिंग केले.
तरुणाची गंभीर अवस्था पाहता, प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी संस्थेच्याच रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालय ओरस येथे दाखल करण्यात आले आहे. अत्यंत वेदनेतून जात असलेल्या आणि एक प्रकारे मृत्यूशी झुंज देत असलेल्या या तरुणावर वेळेत उपचार झाल्याने त्याला मोठा दिलासा मिळाला असून, त्याने सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. संस्थेच्या या तत्पर आणि निस्वार्थ सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.













