शेतात काम करताना अज्ञात प्राणी चावल्याने बेनगी येथील वृद्ध महिलेचा मृत्यू

नाटे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

राजापूर: प्रतिनिधी
तालुक्यातील बेनगी नागलेवाडी येथील गंधाली गजानन नागले (वय ७० वर्षे) या वृद्ध महिलेचा शेतात काम करत असताना अज्ञात विषारी कीटक अथवा प्राणी चावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गंधाली नागले या आपल्या घराजवळील शेतात गवत/रान काढण्याचे काम करत असताना अचानक त्यांच्या उजव्या हाताला काहीतरी चावले. ही बाब लक्षात येताच गौरव गजानन नागले यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी वाहनातून धारतळे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी येथे हलवण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार त्यांना सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे नेण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित केले. या घटनेची नोंद नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (आमृ. क्र. २४/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४) म्हणून करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.