विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सावंतवाडीच्या आरपीडी हायस्कूलचा राज्यस्तरावर डंका

विजेत्यांचा ठाण्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव

सावंतवाडी:महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सावंतवाडी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर दैदीप्यमान यश संपादन करत प्रशालेच्या नावलौकिकात भर घातली आहे. ठाणे येथे आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

मराठी भाषा आणि ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे अठराशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेत ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ या विषयावरील मराठी विश्वकोशातील नोंदी अभ्यासक्रमासाठी देण्यात आल्या होत्या. शंभर गुणांच्या या परीक्षेत पन्नास वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश होता.

या स्पर्धेत राज्यस्तरीय शहरी गटात RPD हायस्कूलच्या इयत्ता नववीतील कु. अश्लेषा उद्धव माळवे आणि कु. सृष्टी गोविंद परब यांनी संयुक्तपणे चौथा क्रमांक पटकावून साडेसात हजार रुपये व सन्मानचिन्ह मिळवले. तर कु. सोहम बापूशेट कोरगावकर याने पाचवा क्रमांक पटकावत पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्राप्त केले.

जिल्हास्तरीय प्रथम (शहरी) गटातही RPD प्रशालेने आपले वर्चस्व कायम राखले. यात तेजस्वी सगम हिने प्रथम, अमेय आपटे याने द्वितीय तर साक्षी गुरव हिने तृतीय क्रमांक पटकावला. तालुकास्तरीय शहरी गटात RPD हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची शमिका केदार व महादेव परब यांनी प्रथम, जान्हवी मेस्त्री हिने द्वितीय आणि अथर्व देवस्थळी याने तृतीय क्रमांक संपादन केला.

जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजेत्यांना सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लवकरच भव्य समारंभात पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे सदस्य वामन पंडित यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत यांच्यासह सर्व संस्था सदस्यांनी कौतुक केले आहे. तसेच मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्या सविता कांबळे, पर्यवेक्षक एन. जी. मुठे, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि पालक-शिक्षक संघाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.