कळसुली – गांगोसकलवाडी येथे ८७ वर्षीय वृद्धाची आत्महत्या

कणकवली : कळसुली – गांगोसकलवाडी येथील परशुराम भिकाजी घाडीगावकर (वय ८७) यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली. गांगेश्वर मंदिर परिसरात त्यांनी नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

परशुराम घाडीगावकर हे मागील काही काळापासून दम्याच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. आजारपणामुळे ते त्रस्त होते. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते गांगेश्वर मंदिर परिसरात गेले होते. याचदरम्यान त्यांनी नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. दुपारी दोनच्या सुमारास ग्रामस्थ लक्ष्मण घाडीगावकर हे गांगेश्वर मंदिर परिसरातून जात असताना त्यांना परशुराम घाडीगावकर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. लक्ष्मण घाडीगावकर यांनी परशुराम यांचे भाऊ हनुमंत भिकाजी घाडीगावकर (वय ६९, सध्या रा. कलमठ-गुरववाडी) यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यासह आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आत्महत्येच्या कारणाबाबतही पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे कळसुली – गांगोसकलवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.